नगर दर्शन (वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील खरडेवस्ती, कोल्हार बु. शिवार येथे कर्जाच्या पैशांच्या वादातून दोन जणांनी शेतकऱ्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन मोटारसायकली बळजबरीने नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक नामदेव माळी (वय 40, रा. खरडेवस्ती, कोल्हार बु. शिवार, ता. राहाता) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोन वर्षांपूर्वी दवाखान्याच्या गरजेसाठी त्यांनी अशोक साहेबराव जाधव (रा. राजुरी, ता. राहाता) यांच्याकडून 6 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर व्याजासह 15 हजार रुपये परत दिल्यानंतरही आरोपींनी आणखी 40 हजार रुपयांची मागणी केली.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी आरोपींनी त्यांची टीव्हीएस स्टार (MH 17 AW 7912) मोटारसायकल ताब्यात घेतली होती. त्यानंतरही 19 मे रोजी सकाळी सुमारे 8 वाजता अशोक जाधव व त्यांचा मुलगा आलोक जाधव हे फिर्यादीच्या घरी आले आणि 40 हजार रुपयांची मागणी करत वाद घातला.
यावेळी दोघांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की करत घरासमोर उभी असलेली पल्सर मोटारसायकल (MH 17 CH 8118) बळजबरीने नेली. तसेच “पैसे दिले नाहीत तर आधी घेतलेल्या गाडीचाही लिलाव करू,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात आरोपी अशोक साहेबराव जाधव व आलोक अशोक जाधव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 308(2), 119(1), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गणेश अडांगळे करीत आहेत.







