नगर दर्शन (वृत्तसेवा):- लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तब्बल 40 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पाथरे बु. (ता. राहाता) येथील शेत परिसरात करण्यात आली.
लोणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 295/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 303(2), 3(5) तसेच महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण कायदा कलम 3 व 15 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार रविंद्र गोपीनाथ मेढे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 जून रोजी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता नदीपात्रातून वाळू उपसा करून तिची वाहतूक केल्याचे आढळून आले. या प्रकरणात मिननाथ संजय घोलप वय 21 वर्षे रा. पाथरे बु ता राहाता.संकेत संतोष क्षिरसाठ वय 24 वर्षे रा. पिंपळगाव रोहा ता पारनेर ह.रा. कानडगाव ता. राहुरी ,राहुल दत्तात्रय दिघे वय 30 वर्षे रा. धानोरे ता. राहुरी,जयेश शिवप्रसाद पांडे वय २३ वर्षे रा. सोनगाव ता. राहुरी, सार्थक दत्तात्रय हुलवन वय २१ वर्षे रा. सोनगाव ता. राहुरी,विशाल संजय पिंपळे वय 21 वर्षे रा. धानोरे ता. राहुरी, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी 20 लाख रुपये किमतीचा जेसीबी, 15 लाख रुपये किमतीचा डंपर, 5 लाख 50 हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर तसेच 16 हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण 40 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने लोणी पोलिसांनी ही मोहीम राबविली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.
अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध लोणी पोलिसांची ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली असून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
वरील कारवाई ही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डीवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे, पोहेको रवींद्र मेढे, निलेश धाढवड, चालक शिवाजी नऱ्हे व होमगार्ड यांनी केली.







