भर पावसात मुलाची अनोखी कावड यात्रा
कोपरगाव ते लोणी पायी प्रवास करून आईच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा !
नगर दर्शन (वृत्तसेवा):-आईप्रती असलेले प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक जण विविध प्रकारे वाढदिवस साजरा करतात. मात्र लोणी बुद्रुक येथील विठ्ठल नगर परिसरातील रहिवासी दीपक धरमसिंग डुलगज यांनी आपल्या आईच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा आणि भावनिक उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दीपक डुलगज हे लोणी पोलीस स्टेशनमध्ये अंशकालीन सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या आई मालनबाई धरमसिंग डुलगज यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी भर पावसात कोपरगाव ते लोणी असा पायी कावड यात्रा करण्याचा संकल्प केला. श्रद्धा, भक्ती आणि आईविषयीची अपार माया मनात ठेवून त्यांनी हा प्रवास पूर्ण केला.
दीर्घ पायी प्रवासानंतर लोणीत पोहोचलेल्या दीपक यांनी आपल्या आईला कावडीचे पवित्र जल अर्पण करून तिचे आशीर्वाद घेतले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित नातेवाईक व नागरिक भावूक झाले. आईच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली.आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जीवनात आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दीपक डुलगज यांचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रद्धा, सेवा आणि मातृभक्तीचा सुंदर संगम असलेली ही कावड यात्रा समाजासमोर आदर्श निर्माण करणारी ठरली आहे.






