घरात घुसून रोख रक्कम, मोबाईल व आधारकार्ड चोरी; लोणी पोलिसांत तीन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
नगर दर्शन (वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील दुर्गापूर शिवारातील पारधेवस्ती येथे दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने घरमालकिणीवर हल्ला करून धमकी दिली, तर तिच्या दोन साथीदारांनी घरातील रोख रक्कम, मोबाईल फोन आणि आधारकार्ड असा एकूण १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
याबाबत रोहीणी मंगेश पारधे (वय २४, रा. पारधेवस्ती, चिंचपूर-दुर्गापूर, ता. राहाता) यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी सायंकाळी ४ ते ४.२० वाजण्याच्या सुमारास रोहीणी पारधे या जनावरांसाठी शेतात घास कापण्यासाठी गेल्या होत्या. घराचे समोरील लोखंडी गेट बंद करून त्या बाहेर गेल्या होत्या. परत आल्यानंतर गेट उघडे दिसल्याने त्या घराकडे जात असताना गेटजवळ उभ्या असलेल्या एका अनोळखी महिलेने त्यांना पकडून, “आरडाओरडा केला तर तुला आणि तुझ्या बाळाला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देत मारहाण केली.
दरम्यान, घरात असलेले दोन अनोळखी पुरुष बाहेर येऊन घटनास्थळावरून पसार झाले. घाबरलेल्या रोहीणी पारधे यांनी तात्काळ शेजाऱ्यांकडे धाव घेतली. नंतर कुटुंबीय व पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी लोणी पोलीस तसेच फिंगरप्रिंट आणि डॉग स्कॉड पथकाने भेट देऊन तपास केला. तपासादरम्यान कपाटातील १० हजार रुपये रोख, Redmi 8A मोबाईल फोन आणि आधारकार्ड चोरीस गेल्याचे उघड झाले.
या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 305(अ), 331(3), 331(5) अंतर्गत गुन्हा क्रमांक २०७/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठवल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.निलेश धादवड हे करीत आहेत.







