टँकर पाणीपुरवठा पारदर्शक ठेवा आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवा :- डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवून नागरिकांना सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा. तसेच आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आवश्यक ती पूर्वतयारी वेळेत पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई व मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी Pankaj Ashia, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार हेमंत ओगले, आमदार किरण लहामटे आणि आमदार आशुतोष काळे यांनी सहभाग नोंदविला.

बैठकीत पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, ज्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तेथे पाणीपुरवठा नियमित, पारदर्शक आणि वेळेवर व्हावा. पिण्याच्या पाण्याच्या योजनांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी सातत्याने समन्वय ठेवावा. जलस्रोतांची उपलब्धता, विहिरींची स्थिती, पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता आणि टँकर व्यवस्थापनाचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील गावे, वस्त्या, वाड्या आणि तांड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणी फिरते जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे. लोकसंख्येच्या आधारावर पाण्याच्या टाक्या उभारून त्याद्वारेच पाणी वितरण करावे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टळेल आणि प्रत्येक नागरिकाला समानतेने पाणी मिळेल.

टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे गावनिहाय वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार वितरण करण्यात यावे. पाणी वाटपावेळी तलाठी आणि ग्रामसेवक यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात यावी. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

याशिवाय, जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. आरोग्य विभागाने प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने नियमित तपासून साप्ताहिक अहवाल सादर करावा, तसेच दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज राहावे, असेही त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचे नमूद करत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज राहून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने काम करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी केले.बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई, टँकर व्यवस्थापन आणि मान्सूनपूर्व तयारीबाबत सविस्तर माहिती सादर केली. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!