नगर दर्शन (वृत्तसेवा):- नगर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच आरोपी नातेवाईकांची नावे वगळण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे मामा व इतर १५ जणांविरोधात ११ मे रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांच्याकडे होता. तपासादरम्यान संबंधित आरोपींना मदत करण्यासाठी आणि काही नातेवाईकांची नावे वगळण्यासाठी गांगुर्डे यांनी सुरुवातीला २ लाख रुपयांची मागणी केली होती. नंतर तडजोडीअंती १ लाख रुपये स्वीकारण्यास ते तयार झाले.
दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला आणि गांगुर्डे यांना नाशिकमध्ये ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






