लोणी (प्रतिनिधी):- वारकरी संप्रदायाच्या संदर्भात शरद पवार यांनी केलेले लिखाण अत्यंत खेदजनक असून, देव, देश आणि धर्मासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींविषयी केलेल्या शब्दप्रयोगाचा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच, ज्यांनी आयुष्यभर नास्तिकतेची भूमिका मांडली त्यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल आधी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विखे पाटील म्हणाले की, वारकरी संप्रदायाचा संदर्भ घेत पुरोगामी आणि प्रतिगामी अशा शब्दांचा खेळ करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, अनेक वर्षांची परंपरा असलेला हा वारकरी संप्रदाय अशा लिखाणाने विचलित होणार नाही. उलट संत परंपरेचा वारसा घेऊन हिंदुत्वासाठी अधिक जोमाने आणि एकसंघपणे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ह.भ.प. भास्करगिरी महाराज, आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज आणि ह.भ.प. रामगिरी महाराज यांसारख्या संतांची नावे घुसखोरांच्या यादीत टाकण्यात आल्याचा आरोप करत, या व्यक्तींनी समाजासाठी सर्वस्व अर्पण केले असून त्यांच्या बाबत ‘घुसखोर’ असा शब्दप्रयोग करणे निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले.
“वारकरी कधीच निधर्मी होऊ शकत नाहीत, कारण वारकरी परंपरेलाच धर्माचे अधिष्ठान आहे. हे अधिष्ठान कमकुवत करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तो यशस्वी होणार नाही,” असे विखे पाटील म्हणाले.
तसेच, महाराष्ट्रातील महापुरुषांना आणि हिंदू समाजातील विविध जाती-जमातींना विभागण्याचे काम ज्यांनी केले, त्यांना वारकरी समुदायातील बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती-जमातींमधील एकोपा पाहवत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.






