कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील धरण व्यवस्थापन सतर्कतेने करा; पालखी सोहळ्यासाठीही जलनियोजनाचे निर्देश – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रात मागील दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणांचे सुरक्षित, वैज्ञानिक आणि समन्वयपूर्ण संचलन करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. धरणांमधून पाण्याचा विसर्ग करताना जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाशी प्रभावी समन्वय राखण्यासह प्रत्येक धरणाचा आपत्कालीन कृती आराखडा (Emergency Action Plan) अद्ययावत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

        कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कृष्णा व गोदावरी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाण्याची लक्षणीय आवक झाली आहे. पुणे विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा जुलैच्या पहिल्या आठवड्यातील १२ टक्क्यांवरून ७ जुलैपर्यंत ३१ टक्क्यांपर्यंत वाढला असून, अवघ्या पाच दिवसांत सुमारे ८०.८ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. खडकवासला धरण समूहात ७.५४ टीएमसी, पवना धरणात ४.८४ टीएमसी, भामा आसखेड धरणात ४.१५ टीएमसी, भाटघर धरणात ५.१६ टीएमसी, वीर धरणात २.०१ टीएमसी आणि नीरा देवघर धरणात २.६२ टीएमसी पाण्याची आवक झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

      नाशिक विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा २६ टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. भंडारदरा धरणात ४.७५ टीएमसी, निळवंडे धरणात १.७१ टीएमसी, दारणा धरणात १.५५ टीएमसी आणि गंगापूर धरणात २.१२ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत वाढला असून, जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा २१.७६ टीएमसीपर्यंत पोहोचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग, केंद्रीय जल आयोग आणि हवामान पूर्वानुमान प्रणालीकडून मिळणाऱ्या अंदाजांचा सातत्याने आढावा घेऊन धरणांमधील आवक, जलसाठा, विसर्ग आणि नदीपात्रातील प्रवाह यांचे नियमित विश्लेषण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले. परिस्थितीनुसार वेळेवर निर्णय घेण्यावर त्यांनी भर दिला.

      आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पालखी मार्गावरील नदीपात्र, कालवे आणि मुक्कामस्थळांवर आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध राहील, याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. वारकरी आणि स्थानिक नागरिकांशी समन्वय ठेवून पालखी सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडेल, यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.मान्सून काळात धरणांची संरचनात्मक सुरक्षितता, यांत्रिक उपकरणे आणि विद्युत प्रणालीची नियमित तपासणी करावी, तसेच धरणावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून परिस्थितीतील प्रत्येक बदलावर बारकाईने लक्ष ठेवावे, असे निर्देश देताना नदीकाठच्या नागरिकांना अचूक, पारदर्शक आणि अधिकृत माहिती समाजमाध्यमांच्या माध्यमातून वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी कृष्णा व गोदावरी खोऱ्यातील पर्जन्यस्थिती, धरणांमधील जलसाठा, पूरपरिस्थिती तसेच आषाढी पालखी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या जलनियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीला पुणे व नाशिक विभागातील जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, दोन्ही महामंडळांचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!