संविधानामुळे देश एकसंघ महिलांसाठी ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ ऐतिहासिक – पालकमंत्री विखे पाटील

SHARE:

राहाता, दि. १४ (प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देश एकसंघपणे प्रगती करत असून, कोणत्याही ग्रंथापेक्षा संविधानच सर्वोच्च असल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

मुकुंदराव सदाफळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गोडकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, मोहनराव सदाफळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र निकाळे, उपाध्यक्ष प्रदीप बनसोडे, सचिव बाळासाहेब कोळगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी पत्रकार सतीश वैजापूरकर, पंकज पिपाडा, सुनील सदाफळ, प्रा. बाळासाहेब गाडेकर, माधव बिडवे, बाळासाहेब गिधाड, हाजी बालमभाई सय्यद, दत्तात्रय पिलगर आणि भानुदास गाडेकर यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील शोषित, वंचित घटकांसाठी केलेला संघर्ष अतुलनीय असून, त्यांच्या विचारांचा प्रसार प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असल्याचा आनंद आहे.

संविधानामुळे देश एकसंघ राहिला असून, केवळ राजकीय हेतूने संविधान बदलण्याच्या चर्चा केल्या जातात, मात्र संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी संसदेत मंजूर झालेले ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ हा ऐतिहासिक टप्पा असून, महिलांच्या हक्कांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला विचार आता प्रत्यक्षात उतरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!