सूरज पवार व ऋतुजा पांळदे यांना तेलंगणातील राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवण्याची संधी
नगर दर्शन (वृत्तसेवा):- लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दाढ बुद्रुक येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, प्राथमिक विभाग व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही माहिती विद्यालयाचे प्राचार्य दीपक डेंगळे यांनी दिली.
तेलंगणा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी विद्यालयातील सूरज सोमनाथ पवार आणि कु. ऋतुजा रामनाथ पांळदे या विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे विद्यालयासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक दादासाहेब तुपे तसेच नितीन साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला योग्य दिशा मिळावी यासाठी संस्थेमार्फत सातत्याने विशेष प्रशिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था दर्जेदार शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. खेळाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे कार्य संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे सुरू आहे. त्यामुळे प्रवरेचे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे तसेच स्थानिक स्कूल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







