नगर दर्शन (वृत्तसेवा):- शैक्षणिक क्षेत्रातील वाढती स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा आणि विविध शिक्षण पद्धतींमुळे विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण निर्माण होत असून विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे पाटील, विनायकराव देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, संस्थेचे संचालक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. विखे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात आधुनिक आणि कौशल्याधारित शिक्षण पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था करत आहे. काळानुरूप शिक्षणावर भर देत प्रवरेच्या शाळा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिर ठरत आहेत. शिक्षण क्षेत्रात विविध ‘पॅटर्न’ निर्माण झाल्यामुळे शिक्षण खर्च आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव वाढत चालला असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होणार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यासाठी रतन टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
१९६४ मध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा भक्कम पाया रचला. आज प्रवरेचे विद्यार्थी जागतिक स्तरावर यश संपादन करत असल्याचा अभिमान व्यक्त करताना शिक्षणातील वाढते व्यापारीकरण चिंतेचा विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले. खाजगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या बाजारपेठेपेक्षा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी प्रवरेचा विद्यार्थी आज सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील शैक्षणिक परिवर्तनामागे प्रवरेची गुणवत्ता कारणीभूत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.प्रारंभी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. “नोकरी शोधणारा नव्हे, तर नोकरी देणारा विद्यार्थी घडवणे” हा संस्थेचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी आणि पालकांना थेट संवाद साधता यावा यासाठी सीईओ हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संस्कारक्षम शिक्षण, राष्ट्रीय एकात्मता, सण-उत्सवांचे सामाजिक महत्त्व आणि कौशल्याधारित शिक्षण यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यावर संस्थेचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले, तर आभार सौ. लीलावती सरोदे यांनी मानले.






