नगर दर्शन (वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, या घडामोडीमुळे जिल्ह्यात भाजप आणि महायुतीची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विरोधकांकडून एकाही उमेदवाराने अंतिम टप्प्यापर्यंत निवडणूक रिंगणात न राहिल्याने भाजपने मोठा राजकीय विजय मिळवला आहे.
सुरुवातीला ही जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची चर्चा होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून राणी लंके यांचे नावही चर्चेत होते. मात्र अंतिम क्षणापर्यंत महाविकास आघाडीकडून कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत भाजपचे प्राजक्त तनपुरे, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दत्तात्रय पानसरे, कमलेश गांधी आणि मच्छिंद्र धुमाळ यांचे अर्ज शिल्लक होते. गुरुवारी मच्छिंद्र धुमाळ आणि कमलेश गांधी यांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर काही काळ संपर्काबाहेर गेलेल्या करण ससाणे यांनीही अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली.
प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात अखेर दत्तात्रय पानसरे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला होता. मात्र महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या चर्चेनंतर अर्ज मागे घेण्याच्या मुदतीच्या अखेरच्या काही मिनिटांत पानसरे यांनीही माघार घेतली. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील १८ वे आमदार ठरले आहेत.
या संपूर्ण प्रक्रियेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या समन्वयाची विशेष चर्चा रंगली. दत्तात्रय पानसरे यांनी अर्ज बळजबरीने किंवा खोट्या सहीने मागे घेतल्याचा आरोप केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर संग्राम जगताप आणि पानसरे यांच्यात बंद दाराआड सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर दोघेही एकाच वाहनातून बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. अखेर पानसरे यांनी माघारीची भूमिका कायम ठेवत अर्ज मागे घेतला आणि प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
या संपूर्ण घडामोडीत डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच शेवटच्या क्षणी निर्माण झालेला पेच सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, या जोडीची तुलना ‘जय-वीरू’शी केली जात आहे.
या बिनविरोध विजयामागे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्याची चर्चा आहे.
यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही प्राजक्त तनपुरे यांना निवडणूक लढविण्यापासून परावृत्त करत अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा करण्यात डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे बोलले गेले होते. आता विधानपरिषद निवडणूक बिनविरोध घडवून आणण्यातही त्यांचे योगदान निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या निकालामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची वाढती संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सर्वपक्षीय समन्वय, संवादकौशल्य आणि संघटन व्यवस्थापनाचे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विजयाकडे महत्त्वपूर्ण राजकीय संदेश म्हणून पाहिले जात असून, जिल्ह्यातील भाजपचे राजकीय वर्चस्व अधिक बळकट झाल्याची चर्चा रंगली आहे.






