नगर दर्शन (वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील पद्मश्री डॉ. विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय पुन्हा एकदा ग्रामीण भागासाठी ‘संजीवनी’ ठरले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सुरू झालेल्या अवयव प्रत्यारोपण केंद्रात, एका आईने आपल्या २९ वर्षांच्या मुलाला मूत्रपिंड दान करून त्याला मृत्यूच्या दारातून परत आणले. सुमारे सहा तास चाललेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, यामुळे ग्रामीण रुग्णांसाठी आशेचा एक नवा किरण निर्माण झाला आहे.
आईच्या मातृत्वाला सलाम
नगर जिल्ह्यातील एका २३ वर्षीय तरुणाचे मूत्रपिंड अचानक निकामी झाले. उपचारासाठी तो लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या डॉक्टरांकडे पोहोचला आणि त्याला आशेचा किरण दिसला. अनेक तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ‘मूत्रपिंड प्रत्यारोपण’ हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. हे ऐकून त्याच्या आईने क्षणाचाही विलंब न करता आपले मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. गेल्या एका महिन्यापासून या शस्त्रक्रियेची तयारी सुरू होती, ज्यामध्ये अनेक चाचण्या आणि तपासण्या करण्यात आल्या. अखेर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. एका आईच्या अमर्याद प्रेमामुळे तिच्या मुलाला नवजीवन मिळाले आहे. या घटनेने मातृत्वाचे श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
ग्रामीण आरोग्याच्या दिशेने मोठे पाऊल
मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने लोणी येथील पद्मश्री डॉ. विखे पाटील ग्रामीण रुग्णालयाला अवयव, हृदय आणि नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी मान्यता दिली होती. या मान्यतेनंतर हे रुग्णालय ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि अनुभवी डॉक्टरांची मोठी टीम तयार आहे. यापुर्वीही दोनवेळा या टीमच्या माध्यमातून मेंदूमृत रूग्णांने मुत्रपींड आणि यकृत अवयवदान केले आहे. ते पुणे आणि नासिक येथे गरजू रूग्णांना पाठविण्यात आलेले आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तसेच लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचावी असे स्वप्न पाहिले. आज, डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याच स्वप्नाची परिपूर्णता झाली, आहे. या रुग्णालयाने केवळ शस्त्रक्रिया केली नाही, तर एका कुटुंबाला पुन्हा हसण्याचा आणि जगण्याचा आनंद दिला आहे. या रुग्णालयाने अवयव प्रत्यारोपण सुविधा सुरू करून आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक मोठे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ नगरच नव्हे, तर मराठवाड्यासह राज्यातील जवळपास सहा ते सात जिल्ह्यांतील गरजू रुग्णांना येथे जीवनदान मिळत आहे.
यशस्वी शस्त्रक्रियेतील डॉक्टरांची टीम
कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही.एन.मगरे, विश्वस्त ध्रूव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव प्रत्यारोपनासाठी डॉक्टरांचा चमू काम करीत होता. या महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेमध्ये रुग्णालय प्रशासनाचे अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. योगेंद्र सिंग, डॉ. एन. एस. पवार, डॉ. सुशिलकुमार झा, डॉ. अक्षय शेट्टी आणि डॉ. एस. एल. टुंगीकर यांचा सहभाग होता. अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ. विपिन विभूते यांच्या नेतृत्वाखाली भूलतज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. राहुल तांबे, डॉ. ऋषिकेश वाघोलीकर, डॉ. मयुर गंगवाल, डॉ. रोहन सूर्यवंशी आणि डॉ. काजल दरंदले,डॉ.सुरजकुमार बांगर, डॉ.भाग्यश्री पुराणिक यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमामुळेच हे शक्य झाले. या यशाबद्दल सर्व डॉक्टरांच्या चमूचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.







